सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

Success can be achieved by good knowledge.

सुविद्या प्रसारक संघाची अठ्ठेचाळीस वर्षांची दैदीप्यमान वाटचाल पूर्ण होऊन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. याचा श्रीगणेशा करण्याच्या हेतूने संस्थेचे आद्य प्रणेते कै. बाबुराव परांजपे यांचे प्रेरणादायी कार्यकर्तृत्व संक्षिप्त स्वरूपात “‘गृहदाते बाबुराव परांजपे – एक झंझावात” हया पुस्तिकेद्वारे प्रकाशित करण्यात येत आहे. सदर पुस्तिकेचे लेखन श्री. सुरेश परांजपे यांनी केले आहे.

आपल्या संस्थेने समाजाच्या व काळाच्या बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आपल्या कार्यात लवचिकता ठेवली आणि या दूरदृष्टीमुळेच आज आपल्या संस्थेची उत्तरोत्तर वाढ होत आहे. शैक्षणिक प्रवाहातील अनेक तज्ञ संस्थेकडे आकृष्ट होत आहेत आणि संस्थेच्या पाठबळाने उत्तमोत्तम दर्जाचे अभ्यासक्रम नवीन पिढीला उपलब्ध करण्यासाठी सज्ज आहेत. अशावेळी अन्य शैक्षणिक संस्थांचे सहकार्य घेऊन व त्यांच्याकडे अतिरिक्त असलेल्या मूलभूत सुविधा शैक्षणिक कार्याच्या विस्तारासाठी उपयोजिण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. तसेच आरोग्य निगा क्षेत्रामधील तंत्रज्ञानाच्या सतत होणाऱ्या अद्यतनीकरणाचा लाभ नर्सिंग इ. पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने Hospital Foundation चे ही सहकार्य घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

बिगर शासकीय संस्था (NGO), धर्मादाय न्यास, CSR Funds व माजी विद्यार्थी (Alumni Groups) यांच्या साहाय्याने कार्यान्वित करण्याचे जे प्रकल्प संस्थेच्या विचाराधीन आहेत ते पुढीलप्रमाणे :
1. UPSC, MPSC व तत्सम स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे प्रशिक्षण.
2. Suvidya Career Preparatory Academy या अंतर्गत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी NATA, NEET, NDA, JEE, CET इ. स्पर्धा परिक्षांसाठी तयारीचे Co-Curricular अभ्यासक्रम.
3. प्रथितयश हॉस्पिटल फाऊंडेशन्सच्या सहकार्याने नर्सिंग कौन्सिलचे अभ्यासक्रम.
4. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्टिफिकेट, डिप्लोमा व डिग्री कोर्सेस.
5. रोगनिदान शास्त्र (Pathology) मधील डिग्री अभ्यासक्रमाचा विस्तार.

संस्थेच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या विस्ताराबरोबर दैनंदिन कामकाज सुरळीत व्हावे या उद्देशाने I.T. Operations Platform विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांशी नियमित संपर्कात राहणे, त्यांना संघटित करणे व संस्थेच्या विकासासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे हे आव्हान संस्थेसमोर आहे. सर्वंकष माहिती पुरविण्यासाठी संकेतस्थळ निर्मिती प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी कार्यकारी मंडळातील काही सदस्य व I.T. क्षेत्रातील तज्ञांचा एक गट तयार करण्यात आला आहे व या संबंधीची कार्यवाही येत्या सहा ते आठ महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सर्वांच्या सहकार्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होईल याची संस्थेस खात्री आहे.

सन 2020-21 मध्ये होणाऱ्या संस्थेच्या सुवर्ण जयंतीची तयारी संस्थेच्या विविध घटकांना सोबत घेऊन सुरू करण्यात आली आहे. या निमित्ताने संस्थेच्या अर्धशतकी कार्यासंबंधीची माहिती आठ ते दहा संकल्पनांच्या कोलाजस्वरूपामध्ये गुंफण करून यथायोग्य प्रसारित करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी जगभर विखुरले आहेत व विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहेत. उपरोक्त I.T. Communication and Interaction Platform विकसित झाल्यावर संस्थेच्या आगामी प्रकल्पांचे तांत्रिक व आर्थिक प्रकल्प विवरण माजी विद्यार्थ्यांच्या बॅचेसना प्रस्तुत करण्यात येईल. तत्संबंधीचे तांत्रिक तसेच आर्थिक सहकार्य त्यांच्याकडून निश्चितपणे प्राप्त होईल याबद्दल आम्हाला खात्री आहे.

संस्थेच्या भावी वाटचालीत आपणां सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. राष्ट्राच्या उभारणीत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपले सामूहिक योगदान या पवित्र कार्यात घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे हितगुज पूर्ण करतो.
धन्यवाद !

श्री. महादेव गोविंद रानडे
कार्याध्यक्ष
सुविद्या प्रसारक संघ, बोरीवली