सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

Success can be achieved by good knowledge.

रुजवात

सध्या संपूर्ण मानवजातीला ग्रासणाऱ्या कोरोना महासंकटाशी सामना करणाऱ्यांमध्ये सुविद्या प्रसारक संघाचे माजी विद्यार्थी आपला खारीचा वाटा उचलत आहेत.

डॉ. मधुरा कुलकर्णी व वैदेही नवाथे

आहारतज्ञ श्रीम. वैदेही अमोघ नवाथे
सुविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थिनी, डॉ. मधुरा कुलकर्णी (१९८४ बॅच) ठाण्यामधील काजूवाडी येथील सरकारी आरोग्य केंद्रात ‘कोरोना प्रतिकार – बाह्य रुग्ण’ विभागात व तिची बहीण आहारतज्ञ वैदेही नवाथे (१९८६ बॅच) मीरा रोड येथील भक्तिवेदांत रुग्णालयातील आहार-विभागात (‘प्रमुख आहारतज्ञ’ पदावर) कार्यरत आहेत व प्रत्यक्ष रुग्णसेवा देत आहेत.
या दोघींनी व्यक्त केलेले मनोगत ---

‘सुविद्यया प्राप्यते यश:’ असे बोधवाक्य असणाऱ्या आमच्या सुविद्यालयात गुरुजनांच्या मदतीने गिरवलेल्या मुळाक्षरांनी मिळवून दिलेले यश आमच्या पाठीशी उभे आहे. आरोग्य क्षेत्रात काम करताना सुविद्यालयात शिकलेल्या सेवा, सद्भाव व करुणा या त्रिसूत्रींच्या बाळकडूचा खूपच उपयोग होत आहे. वैद्यकीय पेशा स्वीकारल्यावर देशाच्या आरोग्य आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णसेवेसाठी उभे राहणे हे तर आमचे कर्तव्यच आहे. त्यामागील श्रेय नक्कीच आमच्या आई-वडिलांचे (सौ. रजनी व श्री. पद्माकर कुलकर्णी) व आमच्या सुविद्यालय शाळेचे आहे. हे कृतज्ञतेचे दोन शब्द खास आमच्या शाळेसाठी व छोट्या आजी विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी ...

विद्या .. तीच श्रेष्ठ जी ‘धाडस’ देते .. !!

संस्कारांची ‘रुजवात’ जी

कोवळ्या मनात झाली,

प्रगल्भतेच्या प्रखर उन्हातही

चांदणे शिंपून गेली !!


डॉ. मधुरा उदय कुलकर्णी
श्री. हर्षद पिंपळे

डॉ. ओंकार पिंपळे

डॉ. श्री. हर्षद पिंपळे
श्री. हर्षद हा सुविद्यालयाच्या १९८५ च्या बॅचचा माजी विद्यार्थी आहे. तो कायदेतज्ञ असून गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेसाठी कार्यरत आहे. मुंबई महानगरपालिकेसंबंधी ज्या विविध जनहित याचिका दाखल केल्या जातात, त्या संदर्भातील कामे पाहणे ही त्याचे नेहमीचे काम आहे.
सध्या मुंबईला ग्रासणाऱ्या कोविड-१९ चा सामना करण्यासाठी महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेमधील सर्व ज्येष्ठ अधिकारी यापूर्वीच वेगवेगळी जबाबदारी निभावत आहेत. त्यांच्या साहाय्यासाठी काही विशेष अधिकारी नेमण्यात आले आहेत.

मुंबईचे पूर्व, पश्चिम व दक्षिण अशा तीन विभागात विभाजन करण्यात आले आहे. यापैकी पश्चिम विभागासाठी (वांद्रे ते दहिसर) नेमणूक करण्यात आलेला विशेष अधिकारी म्हणजे श्री. हर्षद आहे. त्याच्या हाताखाली वॉर्डनिहाय दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई महापालिकेचे अधिकारी व त्यांच्या साहाय्यासाठी नेमलेले हे विशेष अधिकारी महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत.

या विशेष अधिकाऱ्यांवर कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाची संपूर्ण व्यवस्था सोपवण्यात आलेली आहे. यामध्ये रुग्णांसाठी बेड, औषधोपचारांचे पुरेसे साहित्य, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रुग्णवाहिका इ. तसेच या रुग्णांचे जेवण इ. सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत हे पाहण्याची जबाबदारी हे विशेष अधिकारी सांभाळत आहेत. तसेच श्री. हर्षद हा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राज्य सरकार व केन्द्र सरकार यामधील समन्वयकाची भूमिका देखील पार पाडत आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वच आधिकाऱ्यांवर कामाचा अतिशय ताण आहे. तरीसुद्धा हे सर्व अधिकारी सर्व प्रकारे जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत.

विशेष उल्लेखनीय गोष्ट ही की, श्री हर्षद याचा मुलगा डॉ. ओंकार कराड येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत आहे व इंटर्नशिपच्या काळात सध्या तो सुद्धा कराड व आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन कोरोना रुग्णांची तपासणी करत आहे. कोरोना विरुद्ध लढाईसाठी सातारा जिल्ह्यासाठी तयार केलेल्या निवडक पन्नास डॉक्टरांच्या पथकात डॉ. ओंकार याचा समावेश करण्यात आला आहे.

श्री. संदीप भावे आणि किरण भावे


श्री. संदीप भावे आणि किरण भावे
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी हे स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. या सर्वांसाठी, त्यांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी, आपल्याला काय करता येईल असा विचार भावे कुटुंबियांनी केला व कमीत कमी साहित्यापासून पण तरीही खूप उपयुक्त असे चेहरा झाकण्याचे मास्क (Face masks/ Face shields) तयार करायला सुरुवात केली. आसपासची रुग्णालये, पोलीस स्टेशन्स, सुरक्षा कर्मचारी यांना या मास्कचे वितरण करण्यात येत आहे. ह्या उपक्रमाची कल्पना श्री. संदीप भावे (सुविद्यालय बॅच १९८२) याची मुलगी चि. पूजा हिला सुचली व तिला मदत करायला श्री. किरण भावे व कुटुंबीय, श्री. संदीप भावे व कुटुंबीय पुढे सरसावले. समाजाला मदत करण्याचा हा भावे कुटुंबाचा छोटासा प्रयत्न आहे. यामधून प्रेरणा घेऊन ज्ञानयोगमधील व सुविद्यालयातील भावे बंधूंचे मित्र श्री. शैलेंद्र (सुविद्यालय बॅच 1990)व श्रीम. हेमांगी थत्ते व श्री. योगेश आपटे (सुविद्यालय बॅच 1989) आणि कुटुंबीय यांनीदेखील असे फेस मास्क्स बनवायला सुरूवात केली आहे.
भावे कुटुंबियांची सर्वांना विनंती आहे की, आपापल्या परीने समाजासाठी जे होईल ते अवश्य करावे कारण ह्या कठीण काळात कोणालाही केलेली, कुठलीही मदत ही लाख मोलाचीच असेल.

विविध संस्थांना केलेली मदत व नि:शुल्क वितरण

✓ केईएम रुग्णालय २०० मास्क्स
✓ फिनिक्स रुग्णालय ६० मास्क्स
✓ सुश्रुत रुग्णालय १५ मास्क्स
✓ लोटस रुग्णालय १५ मास्क्स
✓ एमएचबी पोलिसस्थानक २५ मास्क्स
✓ सहनिवास सुरक्षारक्षक २० मास्क्स
✓ अत्यावश्यक सेवा कर्मचारी ५० मास्क्स
✓ अपेक्स रुग्णालय २५ मास्क्स
✓ तसेच भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांनाही मास्क्स देण्यात आले आहेत.
श्री. संदीप भावे आणि किरण भावे