सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

श्री. मंगुभाई दत्ताणी विद्यालय

योजना विद्यालय

नमस्कार, सुविद्या प्रसारक संघाच्या नेतृत्वाखाली शाळेच्या माजी प्राचार्या श्रीम.सुहासिनी कुलकर्णी यांनी १९८८ पासून शाळेची धुरा सांभाळली आणि शाळेत एकविसाव्या शतकातील नागरिक घडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. श्री.दत्ताणी परिवाराच्या देणगीतून शाळेची बहुमजली इमारत उभी राहिली आणि शाळेत बहुविध सुविधा निर्माण झाल्या. शाळेचे स्नेहसंमेलन, शाळेचा क्रीडामहोत्सव, सुशोभन, फलकलेखन,शालेय आकाशवाणी,समूहगायन स्पर्धा, विविध परीक्षा आणि अनेक श्रेष्ठ आणि जेष्ठांच्या विचाराने शाळा भारावून गेली. आमच्या शाळेमध्ये दर्शनी फळा, वार्ता विचार, मासिक गीत, वैचारिक, चिंतनार्थ,विज्ञान वेध, क्रीडाजगत आणि सुविचार अश्या मथळ्याखाली फलकावर साप्ताहिक लेखन नियमित केले जाते.त्यामुळे विद्यार्थी चालू घडामोडींशी परिचित रहातात .त्यांचे सामान्य ज्ञान , सामाजिक भान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होऊन एक सुजाण नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न होतो. त्याचप्रमाणे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापना बरोबरच समाजातील विविध क्षेत्रामधील प्रतिष्ठित व्यक्तींना शाळेत विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष भेटीसाठी आमंत्रित केले जाते. त्यामुळे अशा व्यक्तींशी विचार विनिमय करण्याची संधी विद्यार्थी मित्रांना उपलब्ध होते,त्याचा उपयोग त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी होतो.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी - गणित संबोध परीक्षा, डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, हिंदी राष्ट्र भाषा परीक्षा,प्रज्ञा शोध परीक्षा ,NMMS ,NTS, शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकलेच्या एलिमेंट्री आणि इंटर्मिजिएट परीक्षा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, नाट्य, लेखन ,निबंध, एकपात्री प्रयोग, विज्ञान प्रदर्शन, इंग्रजी संभाषण वर्ग, विविध खेळाच्या स्पर्धा, कराटे प्रशिक्षण अश्या विविध मार्गांनी विद्यार्थी विकास सुरू झाला. शाळेला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शाळेचे कौतुक केले आहे. आंतर भारतीचे संस्थापक श्री चंद्रकांत शहा, स्वातंत्र्यसेनानी श्रीमती उषा मेहता, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी, प्रसिद्ध साहित्यिक श्री. राम शेवाळकर, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, प्राध्यापक श्री.मोहन आपटे, खगोलतज्ज्ञ श्री. दा.कृ.सोमण, श्रीमती निलकांती पाटेकर,प्रसिद्ध कवी श्री. नारायण सुर्वे व कवी श्री.मंगेश पाडगावकर , मी सावित्रीबाई बोलतेय सादर करणाऱ्या श्रीमती सुषमा देशपांडे, शिक्षणाधिकारी श्री.ज.मो. अभ्यंकर, श्री.वसंत काळपांडे, श्रीम.माणिक पिटके, शिक्षण सचिव श्रीमती कुमुद बन्सल,शिक्षण संचालक श्री. राघवेंद्रजी पाटील , शिक्षण राज्यमंत्री श्री. सदाशिवराव मंडलिक, मुंबईच्या महापौर श्रीम.निर्मला सामंत प्रभावळकर, महापौर श्रीम. शुभा राऊळ , अभिनय क्षेत्रातील श्री. अरुण नलावडे , श्रीम.मेघना एरंडे, श्रीम.आसावरी जोशी, श्री.तुषार दळवी, श्री. मकरंद अनासपुरे अश्या दिग्गजाची कौतुकाची थाप खूप अभिमानास्पद वाटते . शाळेचे यशस्वी विद्यार्थ्यामध्ये तरुण दिग्दर्शक श्री.श्रीतेज पटवर्धन,प्रसिद्ध रेडिओ जॉकी श्रीमती रश्मी वारंग,सध्या इसरो(ISRO) मध्ये कार्यरत असणारे कु. दीव्यश्री शिंदे, श्री. सूरज भोसले, मेट्रो प्रकल्पात कार्यरत कु.हेमांगी पिसाट,अग्निशमन क्षेत्रातील श्री.रोहित घोगळे, एअरफोर्स पायलट श्री.विजय झेंडे, एम.एस.इ.बी. लेखापाल म्हणून कार्यरत असलेले श्री.अमोल बोरसे ,शिल्पकार श्री.संदीप राऊत, गायिका श्रीम.निशा शिंदे , कुस्तिवीर श्री.अभिषेक तुर्केवाडकर, वेटलिफ्टर मनाली साळवी, रेल्वे अधिकारी श्री. जयवंत पिसाट आणि संरक्षण, कार्पोरेट, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक माजी विद्यार्थी सध्या समाजाची व देशाची सेवा करीत आहेत. ही शाळेच्या यशाची पावतीच आहे. शाळेने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नियोजनबद्ध क्षेत्र भेटीचे आयोजन सतत वीस वर्ष केले. त्यात इयत्ता पाचवी साठी कॅम्लिन इंडस्ट्री,सहावी साठी हाफकीन संस्था,सातवी साठी नेहरू तारांगण, आठवी साठी नेहरू विज्ञान केंद्र,नववी साठी वेधशाळा, दहावी साठी विधानभवन, नववी साठी समाजसेवेचे निवासी शिबिर या सहलींचे सातत्य पूर्वक आयोजन केले. शाळेला सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहे. त्याचा खूप फायदा विद्यार्थ्याना होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ-व्हिडिओ रूमची व्यवस्था आहे. शाळेची इमारत आणि शालेय परिसरात शिक्षणासाठी अतिशय उत्तम वातावरण आहे. अनुभवी आणि विद्यार्थ्यां विषयी तळमळ असणारा शिक्षक वृंद आणि शिक्षकांच्या सूचनांचे पालन करणारा आज्ञाधारक विद्यार्थी या शाळेमध्ये आहे. मा.गो.रा.रानडे आणि मा.श्री.बाबुराव परांजपे यांनी मुलांसाठी एका सुंदर शाळेचे स्वप्न पाहिले. ते सत्यात उतरत आहे याचा खूप आनंद आहे . शाळेने विद्यार्थ्याचे भविष्य चांगले व्हावे या उद्देशाने ह्या योजना आखल्या, त्याचे उत्तम परिणाम सध्या दिसत आहेत. धन्यवाद !