सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

सुविद्यालय

“श्री“

सस्नेह नमस्कार
"आयुष्याच्या आसमंतामध्ये कोणत्याही क्षणी सदिच्छांचा मनमुराद आनंद देणारा आठवणींचा रंगीबेरंगी मोरपिसारा म्हणजे आपली शाळा".
आयुष्यातील सर्वात सुखद दिवस म्हणजे शाळेत असतानाचे दिवस. शाळा सुटल्यावर होणारा तो स्वतंत्रतेचा अनुभव. मित्रांसोबत घालवलेली ती रमणीय संध्याकाळ. मग रात्री शाळेत झालेल्या अभ्यासाची उजळणी.
आज पुन्हा एकदा भूतकाळाच्या आठवणींची शाळेतील पान चाळली तर सरसर सर्व आठवणी जाग्या होतात. कारण आपल्या अखेरपर्यंत आठवणीच आपल्या सोबत असतात. चला तर मग या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करूया. शाळेच्या भिंतींना घुमारे फोडू या, शाळेचा तो कोलाहल आठवूया.
सुविद्या प्रसारक संघाच्या सुविद्यालयाच्या वास्तूचे भूमिपूजन कै. श्री. बाबुराव परांजपे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.१६ मार्च १९७२ रोजी कै. श्री. गो. रा. रानडे यांच्या शुभहस्ते झाले. १९७६ पासून इ.५ वी ते ७ वी च्या वर्गांना शासनमान्यता मिळाली. राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेले शाळेचे प्रथम मुख्याध्यापक कै. श्री. शं. ना. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली शाळेत चालविलेल्या अनेकविध प्रायोगिक उपक्रमांमुळे थोड्याच दिवसात शाळा नावारूपास आली. "उत्तम शिक्षणानेच यशप्राप्ती होते” तसेच “शालेय जीवनातून बाहेर पडणारा विदयार्थी शील, विचार आणि आचार या तीनही गोष्टींत संपन्न असला पाहिजे” या विचारधारांतून 'सुविद्यया प्राप्यते यश:' हे शाळेचे ध्येयवाक्य आकारास आले. जून १९९० साली एक्सर इमारत उभी राहिली. आमदार श्री. राम नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा शानदार सोहळा पार पडला.
आज शाळा सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व सु.प्र.संघ कार्यरत आहे. शाळेत आज सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गात ई-लर्निंग ची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी ग्रंथालय आहे. शाळेत प्रत्येक मजल्यावर तसेच विशेष कक्षात सी-सी टीव्ही कॅमेरे २४*७ तास देखरेखीसाठी सज्ज आहेत. शिक्षण तपस्वी, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, सिने-नाट्यलकलावंत, राजकीय व्यक्ती यांनी शाळेत चालणाऱ्या विविध स्पर्धा-उपक्रमांना भेट देऊन विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर वर्गांचे कौतुक केले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळा स्नेहसंमेलन, विशेष-दिन (विज्ञान-दिन, मराठी भाषा दिन, संस्कृत दिन, इ.), व्याख्याने इ. अनेक उपक्रमाचे आयोजन करते. मुलांच्या ज्ञानात्मक व भावनात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून विविध स्थळांवर शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.
समाजातील विविध मान्यवर मंडळी, शिक्षण विभागातील अधिकारी यांनी शाळेतील शिक्षक-वृंदावर अनेकवेळा कौतुकाची थाप टाकली आहे. शाळेत गेली ४२ वर्ष अव्याहतपणे ‘लोकमान्य टिळक स्मृती आंतरशालेय स्पर्धा’ होणे म्हणजेच लोकमान्य टिळकांप्रती संस्था व शाळेने दर्शविलेला आदर व प्रेमच आहे. आज मनाच्या खिडकीतून पाहताना शाळेच्या शिक्षणाचा उंचावलेला आलेख लक्षात येतो.


आठवेल तुम्हाला तुमच्या शाळेची खिडकी
शाळेच्या खिडकीतून बघताना,
चार भिंतींच्या पलीकडचं सर्व मस्त वाटायचं
शरीर कैद असायचं चार भिंतींच्या आत
मन मात्र बाहेर कुठेतरी भटकत असायचं
मग काय तिच्यातूनच तर मन
बाहेरच्या विश्वात पाऊल ठेवायचं
म्हणून आजही मनात आहे ती ‘शाळा’ आणि ती ‘खिडकी‘
तर चला शाळा पुन्हा पाहूया तिला घडवूया
धन्यवाद !