सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

सुविद्यालय

सुविद्यालय – पूर्व प्राथमिक विभाग

स्थापना १९७१

पूर्व प्राथमिक विभागात प्रवेश करणारी छोटी छोटी मुले म्हणजे जणू मातीचे मऊ गोळेच. सुरुवातीला शाळेत येताना रडणारी, रूसणारी, आईला शोधणारी ही बालके बालमंदिरातील गोड, प्रेमळ आवाजात बोलणाऱ्या ताईंना लगेच चिकटतात. त्यांच्या आपुलकीच्या बोलण्यामुळे हळूहळू मोकळी होऊ लागतात. ताईसुद्धा या मुलांच्या कलाकलाने एक एक गोष्ट त्यांना शिकवू लागतात. त्यांच्याबरोबर गाणी म्हणतात, त्यांना गोष्टी सांगतात इतकेच नाही तर त्यांच्याबरोबर उडया मारतात, धावतात आणि नाचतात सुद्धा.

बालमंदिरातील प्रत्येक विद्यार्थ्यांची ताईंना अगदी बारीकसारीक माहिती असते. त्यामुळेच काही दिवसांनी मुले शाळेत रुळल्यावरच त्या तोंडी अभ्यासाला सुरुवात करतात. गोष्टी सांगतात. वेगवेगळे शारीरिक व बौद्धिक खेळ घेतात. अक्षरओळख करून देतात. थोडे थोडे इंग्रजी शब्द सुद्धा शिकवतात. मुलांवर कुठल्याही गोष्टीसाठी सक्ती करण्यात येत नाही. हसत खेळत, गप्पागोष्टींमधून मुलांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी प्रयत्न केला जातो .

विविध उपक्रमाद्वारे सण व उत्सव साजरे केले जातात. मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास होण्यासाठी व उच्चार सुधारण्यासाठी श्लोकपाठांतर, श्रीमद्भगवद्गीता पाठांतर घेण्यात येते. मुलांना पूर्ण वाक्यात व अर्थपूर्ण बोलण्याची सवय व्हावी आणि सभाधीटपणा यावा यासाठीच बालसभा आयोजित करण्यात येते. हस्तकला, चित्रकला, नृत्य, गायन या कलांविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतात.

अशाप्रकारे बालमंदिरात मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाचा जाणीवपूर्वक विचार होतो. ही जणू त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच ठरते.