सुविद्या प्रसारक संघ

II सुविद्यया प्राप्यते यश: II

सुविद्यालय

सुविद्यालय – प्राथमिक विभाग

स्थापना १९७१

आरंभापासून ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचा विकास’ हेच सुविद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्य ध्येय आहे. बालमंदिरातून पहिलीत येणारे विद्यार्थी चार वर्षे प्राथमिक विभागात पूर्ण वेळ शाळेत बसतात. या छोट्या विद्यार्थ्यांना शाळेत रमविणे हेच प्राथमिक शिक्षकांचे पहिले काम असते.

गेल्या एकूणपन्नास वर्षांपासून श्रीम. गानूबाई, श्रीम. पाटणकरबाई, श्रीम. साळवीबाई, कै. श्रीम. रानडेबाई यासारख्या मुख्याध्यापकांनी, कै. श्रीम. जोशीबाई, श्रीम. बापटबाई, श्रीम. खांडेकरबाई, श्रीम. देशपांडेबाई यासारख्या अनेक शिक्षिकांनी पहिलीत येणाऱ्या छोट्या विद्यार्थ्यांना मातृवत् प्रेम दिले आहे व त्यांच्या मनातील शाळेची भीती दूर करून त्यांना हळूहळू अभ्यास तर शिकवलाच आहे, पण सोप्या सोप्या शब्दांतून, गाण्यांमधून, गोष्टींमधून, वेगवेगळ्या उपक्रमांतून मराठी भाषेची, संस्कृतीची तसेच इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या विषयांची ओळख करून दिली आहे व या विषयांविषयी त्यांच्या मनात आवडही निर्माण केली आहे.

या जुन्या जाणत्या ज्येष्ठ शिक्षिकांकडून अप्रत्यक्ष शिक्षण घेतलेल्या सध्याच्या शिक्षिकाही ध्येयपूर्तीसाठी कायम प्रयत्नशील असतात. व त्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. विविधरंगी कार्यक्रम, शालेय व आतंरशालेय स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यासारख्या कौशल्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास घडावा हीच अपेक्षा असते. शाळेत विविध सण व उत्सव साजरे करण्यात येतात व विद्यार्थ्यांना फलकलेखनाद्वारा त्यांची माहिती देण्यात येते. विद्यार्थ्यांना भारतीय व मराठी संस्कृतीची ओळख करून देण्यात येते. ह्यातूनच आमचा गुणवंत विद्यार्थी घडतो.